वाल्मिक अण्णा जिथे बसून बीड जिल्ह्याचा राजकीय कारभार पाहायचे त्या कार्यालयाला धनंजय मुंडे यांनी गुरुवारी भेट दिली. वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर परळीत तणाव.
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने बुधवारी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. वाल्मिक कराडविरोधातील कारवाईमुळे परळीसह जिल्ह्यात काही भागांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे गुरुवारी परळीत आले होते. त्यांनी परळीतील वैजनाथ मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले.
देवदर्शनानंतर धनंजय मुंडे यांनी परळीत जगमित्र कार्यालयाला भेट दिली.
धनंजय मुंडे काही वेळापूर्वीच जगमित्र कार्यालयात पोहोचले. वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत या कार्यालयातून बीड जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे व्यवस्थापन करत असे. धनंजय मुंडे यांना कार्यालयात पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. एरवी आपापल्या कामांसाठी लोक याच कार्यालयात येत असत, आज मात्र त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली.
वाल्मिक कराडला कोठडीत ठेवलेल्या बीड पोलीस ठाण्याबाहेर कडेकोट बंदोबस्त
एसआयटीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडची चौकशी बीड शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. याठिकाणी बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक, आणि विशेष पोलीस पथकाच्या तुकड्या तैनात आहेत. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तींची नोंद घेतली जात आहे.
वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना अडचण
वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर धनंजय मुंडेंवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली असली, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या त्यांना पाठिंबा दिला आहे.